महाराष्ट्रात 1 मेपासून लोकसंख्या नोंदणी

प प्रतिनिधी
मुंबई      
महाराष्ट्र सरकार 1 मेपासून राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी लागू करणार आहे. महाराष्ट्रात 1 मेपासून जनगणनाचे काम सुरू होणार असून, ते 15 जूनपर्यंत चालेल. त्यानुसार अधिकार्‍यांना माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सीएए, एनआरसी आणि एनपीआरविरोधात देशव्यापी निषेधाच्या पार्श्‍वभूमीवर, महाराष्ट्र सरकारने राज्यात एनपीआर आणि जनगणना अभ्यास सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे.
महाराष्ट्र सरकारचे हे पाऊल या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे, कारण राष्ट्रवादी व काँग्रेसने नुकतेच महाराष्ट्रात एनआरसीला परवानगी देणार नाही असे सांगितले होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सातत्याने एनआरसी, सीएए आणि एनपीआरला विरोध केला आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते चरण सिंह सापरा म्हणाले की, महाराष्ट्रात एनपीआर लागू होणार नाही. एनपीआरला जोरदार विरोध करणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यानेच ठाकरे सरकार सत्तेत आहे. अशा स्थितीत एनपीआर लागू करण्याच्या उद्धव ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे, महाराष्ट्रातील राजकारणामध्ये पुन्हा एकदा एका नवीन वादाला तोंड फुटू शकते. 2 फेब्रुवारी रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात एनपीआरच्या अंमलबजावणीस मान्यता देणार नसल्याचे म्हटले होते. पण आता ज्या बातम्या समोर येत आहे, त्यावरून एनपीआर लागू करण्याची प्रक्रिया महाराष्ट्रात सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहेत. त्यानंतर पुढील वर्षी 9 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या कालावधीत जनगणना केली जाईल. या कामासाठी महाराष्ट्र सरकारने 3.34 लाख कर्मचार्‍यांची नेमणूक केल्याचे सांगण्यात येत आहे.