ईस्ट लंडन (दक्षिण आफ्रिका) - दक्षिण आफ्रिकेने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा एका धावेने पराभव केला. इंग्लंडने विजयासाठी अखेरच्या सहा षटकात सात धावांची गरज होती. पण लुंगी एनगिडीने अखेरच्या षटकात 3 विकेट्स घेत केवळ 5 धावा दिल्या आणि दक्षिण आफ्रिकेला एका धावेने थरारक विजय मिळवून दिला. या विजयासह आफ्रिकेने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
नाणेफेक जिंकून इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आफ्रिकेने निर्धारीत 20 षटकात 8 बाद 177 धावा केल्या. टेम्बा बवुमा आणि कर्णधार क्विंटन डी कॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. डी कॉक 31 धावा करून माघारी परतला. त्यानंतर व्हॅन डेर ड्युसेन याने बवुमासह दुसर्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. व्हॅन डेर ड्युसेन (31) बाद झाल्यानंतर आफ्रिकेचा डाव गडगडला. व्हॅन पाठोपाठ बवुमा (43) बाद झाला.
त्यानंतर डेव्हीड मिलर (16), जेजे स्मट्स (20), ड्वेन प्रिटोरियस (1), ब्युरन हेंड्रिक्स (0), अँडिले फेलुक्वायो (18) ठराविक अंतराने बाद झाले. पहिल्या 11 षटकांत 111 धावा करणार्या आफ्रिकेला अखेरच्या 9 षटकांत केवळ 66 धावा करता आल्या. इंग्लंडच्या ख्रिस जॉर्डनने दोन विकेट्स घेतले.
आफ्रिकेने दिलेल्या 178 धावांचा पाठलाग करताना इंग्लंडला 19 धावांवर पहिला धक्का बसला. सलामीवीर जोस बटलरला (19)हेंड्रिक्सने माघारी धाडले. यानंतर दुसरा सलामीवीर जेसन रॉयने दमदार अर्धशतकी खेळी केली. त्याने 38 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारासह 70 धावा केल्या. कर्णधार मॉर्गनने 34 चेंडूत 7 चौकार व 1 षटकारासह 52 धावा केल्या. एकवेळ इंग्लंड हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते. पण लुंगी एनगिडीने शानदार गोलंदाजी करत आफ्रिकेला 1 धावेने विजय मिळवून दिला.
अखेरच्या षटकाचा थरार
इंग्लंडला अखेरच्या षटकात विजयासाठी 7 धावांची गरज होती. लुंगी एनगिडीच्या पहिल्या चेंडूवर टॉम कुरणने दोन धावा घेतल्या. दुसर्या चेंडूवर एनगिडीने कुरणला बाद केले. तिसरा चेंडू धाव निघाली नाही. चौथ्या चेंडूवर दोन धावा निघाल्या. अखेरच्या 2 चेंडूत 3 धावांची गरज होती. तेव्हा एनगिडीने पाचव्या चेंडूवर मोईन अलीचा त्रिफळा उडवला. अखेरच्या चेंडूवर आदील रशीद धावबाद झाला.
लुंगी एनगिडीची कमाल आफ्रिकेने रोमांचक सामन्यात इंग्लंडचा 1 धावेनं केला पराभव
• Mumbaimitra