मुंबईकरांवर कराचा बोजा नाही

मनपाचा ३३ हजार ४४१ कोटींचा अर्थसंकल्प सादर 



मुंबई | प्रतिनिधी मुंबई महापालिकेचा २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवारी महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी सादर केला. ३३,४३४.५० कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प असून गेल्या वर्षीच्या तुलनेत अर्थसंकल्पात यंदा २७४१.९१कोटी रुपयांची वाढ झाली आहे. महापालिकेने यंदा मुंबईकरांवर कोणताही कर लादलेला नसला तरी पालिकेची आर्थिक स्थिती मात्र कमालीची खालवली आहे. आर्थिक स्थिती सावरण्यासाठी मुंबई महापालिका यंदा पालिकेच्या राखीव निधीतून ४३८० कोटी रुपयांचे कर्ज घेणार आहे. आर्थिक स्थिती खालावल्याने पालिकेने थेट नोकर भरतीही रोखली आहे. करोना व्हायरसचा धोका लक्षात घेता मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. पालिकेने कस्तुरबा रुग्णालयात विशेष वॉर्ड तयार केला असून कस्तुरबा रुग्णालयाचे बळकटीकरणही करण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आरोग्यच्या बजेटमध्ये १४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. मुंबई पालिकेने मआनंदी मुंबईफची घोषणा केली आहे. त्यानुसार महापालिकेने २०३०पर्यंतचे व्हिजनही अर्थसंकल्पात मांडले आहे.


बेस्टसाठी १५०० कोटींची तरतूद  


मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये बेस्टसाठी १५०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ही रक्कम कर्जाची परतफेड, वेतन व्यवस्थापनाबाबत आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करणे, आयटीएमएस प्रकल्पाची अंमलबजावणी यासाठी वापरली जाणार आहे.


शिक्षणासाठी २९४४.५९ कोटींची तरतूद


शिक्षण क्षेत्रासाठी २९४४.५९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये सीबीएसई आणि आयसीएसईच्या शाळांसाठी तसेच अवकाश संशोधनाचे शिक्षण, डिजीटल दुर्बीण आणि वेधशाळेसाठी ही तरतूद.


रस्ते आणि वाहतूकसाठी १६०० कोटींची तरतूद


रस्ते आणि वाहतूक विभागाअंतर्गत २०२०-२१ मध्ये रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या बजेटमध्ये १६०० कोटींची तरतूद केली आहे. याशिवाय फुटपाथच्या दुरुस्तीसाठी ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महिलांच्या वसतिगृहासाठी १० कोटींची तरतूद  करण्यात आली आहे.


महिलांच्या वसतिगृहासाठी १० कोटींची तरतूद


पश्चिम उपनगरात कार्यरत महिलांच्या वसतिगृहाच्या बांधकामासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महिलांसाठी सुरक्षित आणि सोयीसुविधांनी युक्त वसतिगृह बनणार आहे. इनक्यूबेशन लॅबसाठी १५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.


इनक्यूबेशन लॅबसाठी १५ कोटींची तरतूद


मुंबई महानगरपालिकेला मदत करण्यावर भर असलेल्या स्टार्टअप कल्पनांना मुंबई इनक्यूबेशन लॅबमार्फत आर्थिक मदत दिली जाईल. त्यासाठी मुंबई इनक्यूबेशन लॅबसाठी एकूण १५ कोटींची तरतूद.


आगामी वर्षात नोकरभरती नाही


उत्पन्न वाढवण्यासाठी महापालिका प्रयत्न करत आहे. मात्र, त्यासाठी कोणत्याही प्रकारची नोकरभरती आगामी वर्षात होणार नाही.