'नही डर किसी का आज'

केजरीवाल बनले तिसऱ्यांदा मुख्यमंत्री दिल्लीकरांनी देशात नव्या राजकारणाला जन्म दिलाय म्हणत मानले दिल्लीकरांचे आभार पंतप्रधानांची अनुपस्थिती



वृत्तसंस्था नवी दिल्ली 'समस्त दिल्लीकरांचा हा विजय आहे. आजपासून मी सर्वांचा मुख्यमंत्री आहे. गावी कळवा, तुमचा मुलगा मुख्यमंत्री झालाय, असे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताना अरविंद केजरीवाल यांनी आंनदोत्सवात म्हटले. दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६२ जागांवर विजय मिळवून तिसऱ्यांदा सत्तेत येणाऱ्या आम आदमी पक्षाचा शपथविधी सोहळा रविवारी रामलीला मैदानात पार पडला. उपराज्यपाल अनिल बैजल यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. केजरीवाल यांच्यासोबत आणखीन सहा मंत्र्यांनीही पदाची आणि गोपनीयतेची शपथ ग्रहण केली. यामध्ये मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, राजेंद्र पाल गौतम, गोपाल राय, इमरान हसैन आणि कैलाश गेहलोत यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनासह दिल्लीच्या विकासात योगदान देणाऱ्या डॉक्टर, रिक्षा चालक, सफाई कर्मचारी, कामगार, बस मार्शल अग्निशमन दलाचे जवान आदींना विशेष निमंत्रण देण्यात आलं होतं.


यापूर्वी काँग्रेसच्या शिला दीक्षित यांनी तीन वेळेस दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती.मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी रामलीला मैदानात या शपथविधी सोहळ्यासाठी जमलेल्या जनतेलाही संबोधित केले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं होतं. परंतु, दुसऱ्या कार्यक्रमात व्यग्र असल्यानं ते इथे उपस्थित होऊ शकले नाहीत. पण या मंचावरून मी पंतप्रधानांकडे आणि केंद्र सरकारकडे आशीर्वादाची याचना करतो, असे सांगतानाच केंद्रासोबत मिळून दिल्लीच्या विकासासाठी काम करायचं असल्याचं त्यांनी दिल्लीकरांसमोर सांगितले. रामलीला मैदानावर झालेल्या या सोहळ्यासाठी दोन हजार पोलीस, निमलष्करी दलाच्या २५ तुकड्या तैनात करण्यात आल्या होत्या. कॅबिनेटमध्ये एकही महिला उमेदवार नाही यावेळेस केजरीवाल यांच्या सोबत त्यांच्या कॅबिनेट मंत्रिमंडळाने सुद्धा पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यातील आश्चर्याची बाब म्हणजे केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्रीला संधी देण्यात आलेली नाही. त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे यंदा दिल्ली विधानसभा निवडणुकीत विविध आठ मतदारसंघातून मैदानात उतरवण्यात आलेल्या ८ ही महिला उमेदवार या विजयी ठरल्या आहेत मात्र तरीही त्यातील एकीला सुद्धा कॅबिनेट मंत्रिमंडळात स्थान मिळवता आलेले नाही. यंदा दिल्ली विधानसभेत आप ने निवडणुक वचनानाम्यात महिलांसाठी काम करण्यावरून अनेक मुद्दे मांडले होते, मात्र या मुद्द्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी __कॅबिनेट मंत्रिमंडळात एकाही महिलेला समाविष्ट करण्यात आलेले नाही. दिल्लीतील विधानसभा मतदारसंघातून अतिशी मारलेना, राखी बिर्ला,राजकुमारी ढिल्लों, प्रीती तोमर, भावना गौर, बंदना कुमारी, धन्वंतरी चंडेला, प्रमिला टोकस यांना उमेदवारी देण्यात आली होती, या सर्वांनी आपापल्या ठिकाणाहून विजय मिळवला आहे. यापैकी सर्वच महिला नेत्यांनी यापूर्वी आप सोबत काम करताना महत्वपूर्ण कामगिरी बजावली होती, अतिशी यांनी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची सल्लागार _ म्हणून काम पाहिलेले आहे, त्यांच्याच कल्पनेतून दिल्लीतील शाळांचे रुपडे पालटले गेल्याचे सांगण्यात येते. तर दुसरीकडे राखी बिर्ला यांनी २०१३१४ मध्ये सुद्धा आपच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात काम करण्याचा अनुभव घेतलेला आहे.