पंढरपूर : धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न येत्या 18 मार्चपर्यंत सोडवा, अन्यथा मातोश्रीच्या दारात धनगर समाज आमरण उपोषण करु, अशी इशारा मल्हार आर्मीचे नेते सुरेश कांबळे यांनी दिला. धनगर आरक्षणाच्या चळवळीमध्ये काम करणार्या 27 संघटना एकत्र येत मल्हार आर्मी नावाची एक संघटना स्थापन केली आहे. या संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वर्ष सरकार धनगर समाजाला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. याआधी युतीच्या सरकारमध्ये असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंढरपुरात आले होते. त्यावेळी विठ्ठलाच्या साक्षीने त्यांनी धनगर समाजाला एक शब्द दिला होता. जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण देत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. त्यावेळी त्यांनी भाजपवर दबाव टाकून आरक्षणाच्या संदर्भात आवाज उठवला होता, असेही सुरेश कांबळे म्हणाले.
आता ते स्वत: मुख्यमंत्री आहेत. आज धनगर समाजाला आरक्षण द्यावं. आणि आम्हाला न्याय द्यावा. जर आरक्षण दिलं नाही तर यापुढेही आम्ही सरकारच्या विरोधात जाऊ, असेही मल्हार आर्मीच्या नेत्यांनी सांगितले.
येत्या 18 मार्चच्या आधी धनगर समाजाला आरक्षण द्यावं. अन्यथा 18 मार्चला आम्ही बायका, पोरं, गुरं-ढोरं, शेळ्या मेंढ्यासहित आमच्या संपूर्ण धनगर समाजाची वाद्य आणि पारंपारिक वेशभूषा करुन मातोश्रीसमोर उपोषणाला बसू. आमचं आमरण उपोषण असेल. या उपोषणामधून जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी मुख्यमंत्री जबाबदार असतील, असा इशाराही मल्हार आर्मीने दिला. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारची डोकेदु:खी ठरलेला धनगर आरक्षणाचा प्रश्न उध्दव ठाकरे कसा हातळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
...अन्यथा मातोश्रीच्या दारात बायका-पोरांसह उपोषण धनगर समाजाचा इशारा