सरकारमुळंच एअर इंडिया कर्जाच्या धावपट्टीवर थकवले 1350 कोटी


मुंबई : सध्या विक्रीला काढलेल्या एअर इंडियाला कर्जाच्या खड्ड्यात घालण्यात सरकारमधील मंत्री आणि अधिकार्‍यांनी हातभार लावल्याची माहिती समोर आली आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या प्रवासासाठीची एअर इंडियाची तब्बल 822 कोटींची बिले केंद्र सरकारने थकवली आहेत. विविध मंत्रालयातील अधिकार्‍यांनी केंद्र सरकारच्या हमीवर खरेदी केलेल्या तिकिटाचे 526 कोटी 14 लाख थकीत आहेत. असे एकूण 1350 कोटी सरकारनेच थकवले आहेत.
सरकारची मालकी असलेल्या ‘एअर इंडिया’वर जवळपास 60 हजार कोटींचे कर्ज आहे. नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळाने एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्स्प्रेस या दोन कंपन्यांमध्ये 100 टक्के हिस्सा विक्री करण्याला मंजुरी दिली. त्यानुसार दोन्ही कंपन्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरु झाली आहे. मात्र एअर इंडियाला आर्थिक संकटात लोटण्यात सरकारमधील मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाचा मोठा वाटा असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
सर्वसाधारणपणे राष्ट्रपती, उपराष्ट्र्पती, पंतप्रधान या अतिमहत्वाच्या व्यक्ती देशविदेशातील दौर्‍यांसाठी सरकारी विमान कंपनी असल्याने एअर इंडियाने प्रवास करतात. यासाठी एअर इंडियाची चार्टर विमाने वापरली जातात. या प्रवासाचा खर्च संबंधित मंत्रालयांकडून कंपनीला दिला जातो. निवृत्त लष्करी अधिकारी लोकेश बत्रा यांनी एअर इंडियाच्या थकबाकीचा तपशील माहिती अधिकारात विचारला होता. त्यावर दिलेल्या माहितीनुसार अतिमहत्वाच्या व्यक्तींनी 30 नोव्हेंबर 2019 अखेर एअर इंडियाचे 822 कोटी थकवले आहेत. कंपनीला डिसेंबरअखेर 8 हजार 556 कोटींचा तोटा झाला होता.
राष्ट्रीय आपत्ती दरम्यान बचाव कार्यासाठी एअर इंडीयाकडून पुढाकार घेतला जातो. मात्र दुर्देवानेे त्याचीही 9 कोटी 67 लाखांची थकबाकी ’एअर इंडिया’ला अद्याप मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. तसेच परदेशी पाहुण्यांच्या प्रवास खर्चापोटी 12 कोटी 65 लाख केंद्र सरकारने थकवले आहेत.
अतिमहत्वाच्या व्यक्ती आणि मंत्र्यांनी ’एअर इंडिया’चे 822 कोटी थकवले असून विविध मंत्रालयातील अधिकार्‍यांनी केंद्र सरकारच्या हमीवर खरेदी केलेल्या तिकिटाचे तब्बल 526 कोटी 14 लाख थकीत आहेत. तीन वर्षांपासून 236 कोटी 16 लाख अद्याप वसूल झालेले नाहीत. ’एअर इंडिया’ने 281 कोटी बुडीत खात्यात वर्ग केले आहेत.