‘हिमालय’ पुलाचा आराखडा तयार पुरातत्व खात्याच्या मंजुरीची प्रतीक्षा


प प्रतिनिधी
मुंबई      
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील कोसळलेल्या ‘हिमालय’ ब्रीजच्या ठिकाणी पालिकेतर्फे लवकरच नवा पादचारी पूल बांधण्यात येणार आहे. या पुलाचा संपूर्ण आराखडा तयार असून मंजुरीसाठी गेल्याच आठवडयात तो राज्याच्या पुरातत्व खात्याकडे पाठवण्यात आला आहे. पुरातत्व खात्याच्या मंजुरीनंतर तातडीने टेंडर प्रक्रिया राबवून येत्या दोन ते तीन महिन्यांत पुलाचे बांधकाम सुरू करणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील ‘हिमालय’ पूल 14 मार्च 2019 रोजी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांना नाहक जीव गमवावा लागला. शिवाय या दुर्घटनेत 32 जण गंभीर जखमीदेखील झाले होते. विशेष म्हणजे संबंधित पुलाचा स्ट्रक्चरल ऑडिटर डी. डी. देसाई याने ब्रीज ‘गुड कंडिशन’मध्ये असल्याचा अहवाल देऊनही हा ब्रीज कोसळला. त्यामुळे संबंधित देसाई स्ट्रक्चरल ऑडिटरवर कारवाई करून पालिकेकडून मुंबईतील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक दुरुस्ती आणि अतिधोकादायक पुलांची नव्याने उभारणी करण्यात येत आहे. यामध्ये सात जणांचा बळी घेणारा ‘हिमालय’ पूल पालिका कधी बांधणार असा सवाल उपस्थित करण्यात येत होता. या पार्श्‍वभूमीवर पालिका प्रशासनाकडून लवकरच या पुलांचे बांधकाम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळच्या ‘हिमालय’ पादचारी पुलावरून दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी जात असत. मात्र हा पूल कोसळल्यानंतर गेल्या वर्षभर प्रवाशांना सिग्नल यंत्रणेजवळ केलेल्या झेब्रा क्रॉसिंगचा आधार घेत ये-जा करावी लागत आहे. किंवा 200 मीटर अंतरावर असलेल्या सबवेचा आधार घ्यावा लागत आहे.