भारत-अमेरिकेदरम्यान 3 अब्ज डॉलर्सचा संरक्षण करार

नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या बैठकीत संरक्षण करार नेमका कसा होणार आहे या कडे सर्वांचे लक्ष लागले होते.. अखेर, दीर्घ चर्चा आणि वाटाघाटीनंतर ट्रम्प यांनी आज दोन्ही देशांमधील 3 अब्ज डॉलर्सच्या संरक्षण कराराची घोषणा केली. या दरम्यान ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत दहशतवादासंदर्भात कडक वक्तव्य केले आहे. पाकिस्तानने चालवलेल्या दहशतवादाला लगाम घालण्याची गरज असल्याचे ट्रम्प म्हणाले. ट्रम्प आणि मोदी या दोन नेत्यांनी दोन्ही देशांमधील मजबूत संबंधांचा यावेळी संदर्भ दिला. हा भारत दौरा आपण कधीही विसरणार नाही, असेही ट्रम्प यांनी आवर्जून सांगितले.
या करारात अमेरिकेकडून 24 एमएच60 रोमियो हेलिकॉप्टरची 2.6 अब्ज अमेरिकी डॉलर्स इतक्या किंमतीत खरेदी करण्यात येणार आहे. आणखी एक करार हा सहा एएच 64ई अपाचे हेलिकॉप्टरबाबतचा आहे. या करारांतर्गत 80 कोटी डॉलर्सची खरेदी करण्यात येणार आहे. 3 अब्ज डॉलर्सहून अधिकच्या या संरक्षण करारामुळे दोन्ही देशांदरम्यानचे संबंध अधिक मजबूत होतील, असा विश्वास ट्रम्प यांनी यावेळी व्यक्त केला.
आम्ही भारत आणि अमेरिका भागीदारीबाबतच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यात संरक्षण आणि सुरक्षेचा समावेश आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी माहिती देताना सांगितले. आम्ही ऊर्जा धोरणात्मक भागीदारी, व्यापार आणि पिपल-टू-पिपल अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केल्याचे मोदी म्हणाले. संरक्षण क्षेत्रामध्ये भारत-अमेरिकेदरम्यान मजबूत होत असलेले संबंध आमच्या भागीदारीचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, असेही मोदी म्हणाले.
ट्रम्प यांनी यावेळी दहशतवादाचा आवर्जून उल्लेख केला. पंतप्रधान मोदी आणि मी आपल्या नागरिकांना कट्टर इस्लामी दहशवादापासून सुरक्षित ठेवण्यासाठी वचनबद्ध आहोत. पाकिस्तानच्या भूमीत सुरू असलेल्या दहशतवादाला रोखण्यासाठी अमेरिका पाऊल उचलत असल्याचे ट्रम्प म्हणाले.

दिल्लीच्या शाळेला मिसेस ट्रम्प यांची भेट
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत भारत दौर्‍यावर आलेल्या त्यांच्या पत्नी मेलेनिया मंगळवारी दुपारी दिल्लीच्या एका शाळेत पोहोचल्या. रंगीबेरंगी वेषभूषेमध्ये असलेल्या मुलांनी अमेरिकेच्या प्रथम महिलेचे स्वागत केले. मेलेनिया यांनी सर्वोदय को-एड सीनियर सेकेंडरी शाळेत काही वेळ घालवला. त्यादरम्यान त्या शाळेतील मुलांसोबत व शिक्षकांसोबत मनमोकळेपणाने बोलताना दिसल्या. गुलाबी लेहंगा घालून स्वागत करण्यासाठी तयार असलेल्या एका मुलीसोबत तर मेलेनिया यांनी बराचवेळ बातचीत केली. सुरक्षेच्या कारणांमुळे या शाळेचे नाव अगोदर सर्वांसमोर उघड केले गेले नाही. मात्र या कार्यक्रमाबद्दल वाददेखील झाला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कार्यक्रमात बोलावले गेले नाही. यासाठी सुरक्षेची करणे दिली गेली आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मेलेनिया यांच्या शाळेच्या दौर्‍यापूर्वी ट्वीट करून आनंद व्याकर केला आहे. ते म्हणाले की, आज दिल्लीचे शिक्षक, विद्यार्थी आणि दिल्लीकरांसाठी खूप मोठा दिवस आहे. मेलेनिया आपल्या शाळांमधून हॅप्पीनेसचा संदेश घेऊन जातील.