मोबाईल चोरणारी फटका गँग पोलिसांच्या जाळ्यात

प्रतिनिधी
नवी मुंबई
चालत्या लोकलमधील प्रवाशांच्या हातावर प्रहार करून त्यांना लुटणार्‍या फटका गँगला वाशी रेल्वे पोलिसांनी अखेर अटक केली. उमर शेख (21), मोहम्मद शेख (18), रेहान कुरेशी (18) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे असून त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रेल्वे पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले चारही जण मुंबईच्या वांद्रे परिसरातील रहिवासी आहेत. नवी मुंबईतील तुर्भे ते सानपाडा रेल्वेस्थानकांदरम्यान रेल्वेमार्गालगत दत्तमंदिर आहे. मंदिराच्या परिसरात सायंकाळी सात ते रात्री नऊ अशा गर्दीच्या वेळी रेल्वे प्रवाशांच्या हातावर फटका मारून मोबाईल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नंदकिशोर सस्ते यांनी याची गंभीर दखल घेतली. व चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी सक्रिय झाले. दुपारी तीन रात्री दहापर्यंत त्या ठिकाणी दररोज सापळा लावण्यास सुरुवात केली. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास दोघे जण फटका मारून मोबाईल चोरताना पोलिसांच्या सापळ्यात अडकले.