महाराष्ट्राच्या लेकीची मृत्यूशी झुंज संपली ऑरेंज सिटी रुग्णालयात घेतला अखेरचा श्‍वास

दारोडा गावावर पसरली शोककळा
आरोपीला ताब्यात देण्याची कुटुंबियांची मागणी
पेट्रोल टाकून जाळण्याचा गावकर्‍यांचा आक्रोश




वर्धा ः हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील पीडितेवर आज संध्याकाळी पाच वाजता दारोडा येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गेल्या सात दिवसांपासून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिनं अखेरचा श्‍वास घेतला.
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी बोलणे झाल्यानंतर पीडितेच्या वडिलांचे समाधान झाले. तसेच त्यांनी मृतदेह स्वीकारला. यानंतर ते आपल्या गावाच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वी फुलराणीच्या निधनाचे वृत्त समोर येताच कुटुंबियांनी नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात आक्रोष केला. एकही शासकीय अधिकारी येऊन भेटले नाहीत. फुलराणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली होती. वडिलांसह गावातील सरपंचांनी सुद्धा रुग्णालयात संताप व्यक्त केला. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मध्यस्थी केली. तसेच तिच्या भावाला नोकरी देण्याचे आश्‍वासन दिले.
पीडितेवर रविवारी चौथी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, औषधोपचारांना तरुणीकडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. तरुणीच्या शरीरातील प्राणवायूचे घटते प्रमाण काळजीची बाब झाली होती. रविवारी मध्यरात्रीपासून पीडितेची प्रकृती अत्यंत खालावली. पीडितेचा रक्तदाब हळूहळू कमी होत गेल्यानंतर सकाळी तिला दोनवेळा हृदयविकाराचा झटका आला. त्यात सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी तिचा मृत्यू झाला.
उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाल्याचं समजताच तिच्या गावात शांतता पसरली. ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाला. आरोपीलाही पेटवा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. तिचं पार्थिव गावात आणताच, ग्रामस्थांना भावना अनावर झाल्या. तिच्या घरासमोर मोठी गर्दी झाली होती. पीडितेच्या अंत्ययात्रेत शेकडो नागरिक सहभागी झाले होते. संध्याकाळी पाचच्या सुमारास तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबीय, नातेवाइक आणि ग्रामस्थांना शोक अनावर झाला होता.
आरोपीला देखील तशाच वेदना द्या
नागपूरच्या रुग्णालयात सकाळी 7 वाजेच्या सुमारास हिंगणघाट पीडितेची मृत्यूशी झुंज संपली. यानंतर तिच्या दारोडा गाव आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांसह कुटुंबियांनी आक्रोष केला. आमच्या कुटुंबांची हानी झाली आहे. आम्ही काय वेदना सहन केल्या आमचे आम्हाला माहीत. आरोपीला सुद्धा तशाच वेदना द्या, त्याला पेट्रोल टाकून जाळा अशी भावनिक मागणी पीडितेच्या आई आणि वडिलांनी केली आहे.
वर्धासह हिंगणघाट परिसरात चोख पोलिस बंदोबस्त
हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूचे वृत्त समोर येताच वर्धासह तिच्या गावात आणि हिंगणघाट तालुक्यात ठीक-ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निधनाचे वृत्त ऐकून गावात शोककळा पसरली आहे. सर्वत्र शुक-शुकाट आहे. त्यातच वर्धातील छोट्या व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवण्याचा निर्धार घेतला आहे. तर दुसरीकडे, नागरिकांनी संयमाने वागावे. आम्ही कायदा आणि सुव्यवस्थेची तयारी केली आहे असे वर्धा जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितले आहे. दरम्यान, दुपारी दोन वाजेच्या सुमारास पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

महाराष्ट्र दयामाया दाखवणार नाही
आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसे या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू, हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असे आश्‍वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.