विश्‍व हिंदू महासभेच्या नेत्याची हत्या


लखनऊ    
 उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विश्‍व हिंदू महासभेचे उत्तर प्रदेश अध्यक्ष रणजीत बच्चन यांची आज सकाळी गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली आहे. मॉर्निंग वॉकसाठी गेले असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या आधी यूपीत हिंदूवादी नेते आणि हिंदू समाज पार्टीचे अध्यक्ष कमलेश तिवारी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेला दावा पुन्हा एकदा पोकळ ठरला आहे. राज्याच्या राजधानीत गुंडांचा हैदोस असल्याचे आज पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरखपूरमध्ये राहणारे रणजीत बच्चन हे आज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. मॉर्निंग वॉक करीत असताना मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञांत व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी घातली. त्यामुळे रणजीत बच्चन यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेवून तो शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे. रणजीत बच्चन यांची हत्या कोणी केली. काय कारण असू शकते. याचा तपास पोलीस करीत आहेत.