घुसखोरांविरोधात मनसेचा एल्गार
मुंबई :
‘जास्त नाटकं कराल तर दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल,’ असा सज्जड ठाकरी इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसी विरोधात मोर्चे काढणार्यांना दिला. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात राज यांनी मुंबईत रविवारी मोर्चा काढला. यावेळी आझाद मैदान येथे आयोजीत सभेला संबोधीत करताना ते बोलत होते. तसेच पाकिस्तान आणि बांगलादेशमुधून आलेल्या घुसखोरांना हाकलचं पाहिजे, त्याबाबत कोणतीही तडजोड नको. आज माझं केंद्र सरकारला हेच सांगणं आहे. जर तुम्ही देशातील आर्थिक प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून हे कायदे आणणार असेल तर ते चुकीचं आहे. हे कायदे करणार असाल, तर त्याची कठोर अंमलबजावणी करा अशी मागणी केली.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून रविवारी 9 फेब्रुवारी रोजी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी तीन वाजता सहभागी झाले. यानंतर राज ठाकरेंनी आझाद मैदानात भाषण केलं. यावेळी त्यांनी हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे आपल्या भाषणातून जाहीर केले. तत्पूर्वी राज ठाकरे मोर्चाला जाण्याआधी त्यांनी प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये सहभागी मनसे नेत्यांनी पांढरे शर्ट आणि दंडावर भगवे बॅच लावले होते. त्यामुळे सर्वत्र या लूकची चर्चा सुरु होती. हा मोर्चा दुपारी 12 वाजता निघणार होता. मात्र, गर्दीचा ओघ वाढत असल्यानं मोर्चा सुरू होण्यास उशीर झाला. दुपारी तीनच्या सुमारास मरिन लाइन्सवरील हिंदू जिमखाना येथून मोर्चा सुरू झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं. त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे, मनसेच्या नेतेपदी निवड झालेले राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे देखील मोर्चात सहभागी झाले होते. आझाद मैदानात या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. तिथं राज यांनी मोर्चेकर्यांना संबोधित केलं.
भगवेमय वातावरण
मराठीच्या मुद्द्यावरून राजकारण करणार्या मनसेनं काही दिवसांपूर्वीच पक्षाचा झेंडा बदलून राजकीय ट्रॅक बदलण्याचे संकेत दिले होते. त्याच अधिवेशनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील घुसखोरांचा मुद्दा उचलला होता व त्या विरोधात मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज हा मोर्चा निघाला. या मोर्चासाठी राज्याच्या विविध जिल्ह्यांतून हजारोंच्या संख्येनं मनसैनिक सकाळपासूनच मुंबईत दाखल झाले. औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर, पुणे, ठाण्यातील मनसैनिकांची मोर्चाला मोठी उपस्थिती होती. शिवरायांची राजमुद्रा असलेला मनसेचा नवा भगवा झेंडा हा मोर्चाचं मुख्य आकर्षण होता. मोर्चासाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांवर व हातात हे झेंडे पाहायला मिळत होते. त्याशिवाय, मनसेच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर खूश असलेले अनेक कार्यकर्ते भगवा वेष परिधान करून मोर्चात सहभागी झाले होते. त्यामुळं संपूर्ण वातावरण भगवामय झाले होते.
भारत धर्मशाळा आहे का?
बाहेरच्या देशातल्यांनी भारतात राहायला भारत धर्मशाळा आहे का, असा सवाल त्यांनी केला. ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांनी चालते व्हावे, असे ते म्हणाले. बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना बाहेर काढण्याची मागणी त्यांनी केली. पाकिस्तानवरही त्यांनी टीका केली. पाकिस्तान दहशतवादाचा अड्डा असल्याची टीका त्यांनी केली. मुंबईत बॉम्बस्फोट करणारा दहशतवादी दाऊद पाकिस्तानचा होता. जिथे भुसभुशीत जमीन आहे, तिथेच घुशी होतात. ही बिले बुजवली पाहिजेत. काही हिंदू आहेत, किंवा इतर आपल्या राज्यातील आहे. त्यांच्याकडे पुरावे नाहीत. त्यांच्याकडे कशासाठी पुरावे मागायचे. ते येथीलच आहे. मात्र, घुसखोरांची सफाई होण्यासाठी कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. राज्याला सांगून उपयोग नाही. केंद्राला सांगतो माझ्या मुंबईतील पोलिसांना 48 तास द्या, ते महाराष्ट्रातील गुन्हे शून्य टक्क्यावर आणतील, असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
पोलिसांना 48 तास मोकेळे द्या
पाकिस्तान आणि बांगलादेशातून भारतात मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाली असून एकट्या बांगलादेशातूनच 2 कोटी लोक भारतात राहत आहेत. त्यामुळे देशात सुरक्षा व्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा ताण पोलिसांवर येतो. देशात कुठूनही माणसे येत आहेत आणि अनुचित प्रकार घडल्यानंतर आपण पोलिसांना बोल लावतो. माझे महाराष्ट्र सरकारला आवाहन आहे की, त्यांनी पोलिसांना 48 तास मोकळे द्यावेत. हे पोलीस 48 तासांत क्राईम रेट शून्यावर आणू शकतात. हेच ते आझाद मैदान जिथे रझा अकादमीविरोधात मोर्चा काढला होता. बांगलादेशातून जवळपास 2 कोटी लोक आलेत. आम्ही हिंदु मात्र बेसावध आहोत. कारण आम्ही दंगल झाली की हिंदु असतो. तसे ते जागृत आहेत तसे आपण असायला हवे. देशात एक जागा आहे, जिथे मौलवी येतात. त्याबद्दल गृहमंत्र्यांना सांगणार आहे. बॉम्बस्फोट झाला, की आम्ही मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढायचा. एवढेच आपण करतो.
तर त्यांना भारत नागरिकत्व देईल
अनेकांना सीएए, एनआरसी कायदा काय आहे याची माहितीही नाही. आज जो कायदा केला आहे त्यात पाकिस्तान, अफगानिस्तान आणि बांगलादेश येथे जर धार्मिक अल्पसंख्यांकांवर अन्याय झाला तर त्यांना भारत नागरिकत्व देईल. 1955 चा हा कायदा आहे. फाळणी झाल्यानंतर 1955 ला हा कायदा झाला. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. आज 2000 मधील परिस्थिती वेगळी आहे. तो देश त्यावेळी भारतापासून वेगळा झाला होता. मात्र, आज त्या देशाची काय अवस्था आहे. एकतर उजवीकडे राहा किंवा डावीकडे राहा अशी सध्या परिस्थिती आहे. केंद्राने काही वाईट केलं आणि त्यावर टीका केली तर ते भाजपविरोधात आणि केंद्राकडून काही चांगले निर्णय झाले आणि कौतुक केलं तर ते भाजपकडून असं बोलतात, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. जेव्हा भाजपने चांगले निर्णय घेतले तेव्हा त्यांचं कौतुक केलं. एकतर इकडंचं किंवा तिकडचं असं झालं आहे. सीएए फक्त चार ओळीचं आहे. प्रश्न पाकिस्तानच्या परिस्थितीचा आहे. आज पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
‘तर तलवारीला तलवारीने उत्तर’ आझाद मैदानावर ‘राज’ गर्जना