न्यूझीलंडकडून भारताला व्हाईटवॉश, निराशाजनक हार

माउंट माँगनुई: 

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने दिलेल्या व्हाईटवॉशचा बदला न्यूझीलंडने वनडे मालिकेत व्हाईटवॉशने दिला. तिसर्‍या आणि अखेरच्या वनडे सामन्यात न्यूझीलंडने 5 विकेटनी विजय मिळवत मालिका 3-0ने जिंकली. भारताने विजयासाठी दिलेले 297 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 17 चेंडू राखून पार केले. न्यूझीलंडचा हेन्री निकोल्सला सामनावीर तर रॉस टेलरला मालिकावीर पुरस्कार देण्यात आला.
रवींद्र जडेजाने रॉस टेलरला 12 धावांवर बाद करून न्यूझीलंडची मोठी विकेट घेतली. पण टॉम लॅथम आणि कॉलिन डी ग्रँडहोम यांनी न्यूझीलंडला सहज विजय मिळवून दिला. लॅथमने नाबाद 32 तर कॉलिन नाबाद 58 धावा केल्या.
भारताकडून चहलने सर्वाधिक 3 विकेट तर ठाकूर आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
भारताने केएल राहुलच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करत 296 धावा केल्या होत्या. विजयासाठी 297 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडला मार्टिन गप्टिल आणि हेन्नी निकोल्स यांनी शानदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागिदारी केली. गप्टिल 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या कर्णधार केन विल्यम्सनला चहलने 22 धावांवर बाद केले. पण तोपर्यंत न्यूझीलंडने सामन्यावर पकड मिळवली होती. निकोल्सने 80 धावा केल्या. त्याला शार्दुल ठाकूने बाद केले. त्याआधी तिसर्‍या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय डावाची सुरूवात पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल यांनी केली. मात्र मयांक पुन्हा एकदा अपयशी ठरला. तो एक धाव करून बाद झाला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली देखील 9 धावांवर बाद झाला. दोन गडी बाद झाल्यानंतर पृथ्वी आणि श्रेयस अय्यर ही जोडी मैदानात होती. पृथ्वीने त्याच्या स्टाईलने आक्रमक खेळ सुरू केला. पण 40 धावांवर तो रनआऊट झाला. पृथ्वी बाद झाला तेव्हा भारताची अवस्था 3 बाद 62 अशी होती.