एमआयईबीला बरखास्त करण्याची मागणी
प प्रतिनिधी
मुंबई
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळातील (एमआयईबी)कारभाराविषयी सातत्याने विविध बाबी समोर येत आहेत. यातच राज्याच्या नवनिर्वाचित सरकारने हे मंडळ बंद करण्याच्या हालचाली सुरू असताना आता राज्यातील शिक्षक, पालक, अभ्यासक, संशोधक, कार्यकर्ते, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षण क्षेत्राविषयी आस्था बाळगणार्‍या नागरिकांनी एमआयईबी बरखास्त करून मंडळाच्या स्थापनेपासून आजपावेतो मंडळाच्या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शिक्षणमंत्र्यांकडे केली आहे. तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या या मंडळाच्या कारभारावर आता प्रश्‍नचिन्ह तयार झाले आहे. एमआयईबीच्या निर्मितीपासून गोपनीयतेच्या पडद्याआडून मनमानी कारभार सुरू आहे. एकाच वेळी राज्यघटना, शिक्षण हक्क कायदा, बहुजनांची संस्कृती, आधुनिक शैक्षणिक विचार, ‘राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005’ मधल्या शिफारसी या सगळ्यांशी इतकी घोर प्रतारणा शालेय शिक्षण विभागाने केल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे शिक्षणमत्र्यांनी याबाबत लक्ष घालून हे मंडळ बरखास्त करावे व मंडळाच्या आत्तापर्यंतच्या कारभाराची चौकशी करावी, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे. एमआयईबीच्या शाळांमध्ये होणारे प्रवेश थांबले असून येत्या शैक्षणिक वर्षापासून हे वर्ग सुरू राहणार की नाहीत याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली.