नवी दिल्ली: क्रिकेटमधील सट्टेबाजाचा बुरखा लवकरच फाडला जाणार आहे. यासंदर्भात दिल्ली पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे. 19 वर्षानंतर जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठा सट्टेबाज संजीव चावला याला दिल्ली पोलिसांचे एक पथक लंडनहून भारतात आणणार आहे.
चावलाच्या प्रत्यार्पणासाठी दिल्ली पोलिसांच्या पथकाने गेल्या महिन्यात अनेक वेळा लंडनचा दौरा केला होता. त्यानंतर चावलाला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. डीसीपी (गुन्हे) जी राम गोपाल नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने स्कॉटलंड यार्डकडून बुधवारी चावलाला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला दिल्लीत आणण्याची प्रक्रिया सुरू झाली.
दिल्ली पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्कॉटलंड यार्डकडून मोस्ट वॉटेड आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाज चावला याला रात्री अडीचच्या सुमारास भारतीय पोलिसांच्या ताब्यात दिले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हीथ्रो विमानतळावर त्याचा ताबा भारतीय पोलिसांनी घेतला. सुरक्षेच्या कारणामुळे चावला याला कोणत्या विमानाने आणि नेमके किती वाजता भारतात आणले जाणार आहे, याचा तपशील देण्यात आलेला नाही. सकाळी साडे अकरापर्यंत त्याला दिल्लीत आणले जाईल, असे समजते.
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएने 2000 साली केलेल्या मॅच फिक्सिंग प्रकरणात चावला देखील आरोपी होता. चावलाने 1996 मध्ये ब्रिटिश नागरिकत्व स्विकारले होते. क्रोनिएचा 2002 मध्ये एका विमान अपघातात मृत्यू झाला होता.
क्रिकेट सट्टेबाजांचा किंग भारताच्या ताब्यात अनेक मोठे खुलासे होणार