‘प्रत्येक धार्मिक तीर्थस्थळावर एसटी डेपो उभारणार’
प प्रतिनिधी
नाशिक      
महाराष्ट्र राज्यात राज्य परिवहन महामंडळाचे 50 डेपो उभरण्याची मागणी सरकारकडे केली आहे, प्रत्येक धार्मिक तीर्थस्थळावर डेपो उभारण्यात येणार असून आज याची सुरुवात नाशिक येथील त्र्यंबकेश्‍वर येथून करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शनिवारी साईदरबारी हजेरी लावत साईसमाधीचे दर्शन घेतले. यावेळी मंत्री परब यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी सत्कार केला.  यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपजिल्हाध्यक्ष रमेश गोंदकर, शिवसेना शहरप्रमुख सचिन कोते,अमोल गायके आदी पदाधिकारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
दर्शनानंतर मंत्री परब यांनी पत्रकारांशी संवाद साधताना एस.टी संदर्भात अनेक मुद्दे मांडले. राज्यात पन्नास डेपो उभारण्याची मागणी सरकारकडे केली आहे. प्रत्येक धार्मिक तीर्थस्थळावर डेपो उभारण्यात येणार असून आज याची सुरुवात नाशिक त्र्यंबकेश्‍वर येथून करण्यात येणार आहे. त्याआधी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो आहे. राज्यात शिवशाही बसेसचे जे काही अपघातात होत आहेत त्याची मी कारणे शोधली आहेत, त्या खासगी ठेकेदारामार्फत चालविल्या जातात. त्यांनी किती फायदा करुन दिला याचा आणि मंडळाने या चालविल्या तर काय होईल याचा अभ्यास करत असल्याचे सांगत त्यानंतर शिवशाही बसेस बाबत निर्णय घेणार असल्याचे त्यांनी म्हटले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील सरकार पडणार असल्याचे म्हणत आहे यावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की विरोधकांना दिवसा स्वप्न पडत असतात.