हॅमिल्टन: न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला दोन धक्के बसले. प्रथम फलंदाजी करताना 347 धावांचा डोंगर उभा करून देखील भारताचा पराभव झाला. या पराभवानंतर आयसीसीच्या कारवाईला भारतीय संघाला सामोरे जावे लागले. विशेष म्हणजे न्यूझीलंड दौर्यात तिसर्यांदा आयसीसीने भारतीय संघावर कारवाई केली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वनडेत 347 धावा करून देखील भारताचा 4 विकेटनी पराभव झाला. सामन्यात भारताकडून श्रेयस अय्यरने 103 धावांची शतकी खेळी केली तर लोकेश राहुलने नाबाद 88 आणि कर्णधार विराट कोहलीने 51 धावा केल्या. भारताने 4 बाद 347 धावा केल्यानंतर न्यूझीलंडने 11 चेंडू आणि 6 गडी राखून विजय मिळवला.
पहिल्या सामन्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल आयसीसीने भारतीय संघाला दंड केला आहे. यावेळी आयसीसीने भारतीय संघाला सामन्यातील मानधनाच्या 80 टक्के इतका दंड केला आहे. न्यूझीलंड दौर्या धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दल भारतीय संघाला दंड होण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी टी-20 मालिकेत दोन वेळा भारतीय संघाला याच कारणासाठी दंड झाला होता.
आयसीसीचे सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी भारतीय संघाला निश्रि्चत वेळेत षटके पूर्ण न केल्याबद्दल दंड केला. भारतीय संघाने नियमीत वेळेपेक्षा चार षटके अधिक वेळ घेतला. आयसीसीचा नियम 2.22 नुसार निश्रि्चत वेळेनंतर जितकी षटके टाकली जातात अशा प्रत्येक ओव्हरसाठी 20 टक्के दंड केला जातो. टी-20 मालिकेतील चौथ्या आणि पाचव्या सामन्यात भारतीय संघाला अनुक्रमे 40 आणि 20 टक्के इतका दंड करण्यात आला होता. पहिल्या वनडेत धीम्या गतीने षटके टाकल्याबद्दलची चूक कर्णधार विराट कोहलीने मान्य केली असून याप्रकरणाची सुनावणी होणार नसल्याचे आयसीसीने सांगितले.
कुलदीपची ती चूक महागात पडली
न्यूझीलंडच्या डावात कुलदीप यादवने रॉस टेलरला बाद करण्याचा एक गोल्डन संधी गमावला. कुलदीपने टेलरचा एक कॅच सोडला ज्याचा फटका संपूर्ण संघाला बसला आणि या दौर्यातील पहिला पराभव पाहावा लागला. भारताकडून रविंद्र जडेजा 23वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील तिसर्या चेंडूवर रॉस टेलरने शॉट मारला. टेलरला स्वीप शॉट खेळाचा होता पण बॅटच्या एजला लागून चेंडू हवेत उडाला. तेव्हा शॉर्ट फाइन लेगला कुलदीप यादव क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. कुलदीपला टेलरचा कॅच घेता आला नाही. टेलर तेव्हा 12 धावांवर खेळत होता आणि न्यूझीलंडचा स्कोअर 2 बाद 125 असा होता.
कुलदीपने हा कॅच सोडल्याबद्दल जडेजा देखील नाराज झाला. तर टेलरने त्याला मिळालेल्या जीवनदानाचा योग्य फायदा घेत संघाला भारताविरुद्धचा पहिला विजय मिळवून दिला. कुलदीपने या सामन्यात 10 षटकात 84 धावा देत 2 विकेट घेतल्या. वनडेमधील भारतीय गोलंदाजाने टाकलेली ही तिसर्या क्रमांकाची महाग ओव्हर ठरली.
मैदानाबाहेर देखील कोहलीच ‘विराट’
सलग तिसर्या वर्षी अव्वल!
नवी दिल्ली: जागतिक क्रिकेटमधील अव्वल फलंदाज रन मशीन विराट कोहली फक्त मैदानावरच नाही तर मार्केट व्हॅल्यूबाबत सुपरहिट आहे. फलंदाजीत आणि कर्णधार म्हणून अनेक विक्रम स्वत:च्या नावावर करणारा विराट कोहली भारतीय सेलिब्रिटी ब्रँड व्हॅल्यू मध्ये सर्वांना मागे टाकत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. विशेष म्हणजे विराटने सलग तिसर्या वर्षी पहिले स्थान मिळवले आहे.
अमेरिकेच्या ग्लोबल अॅडव्हाझरी फर्म डफ अॅण्ड फेल्प्सच्या रिपोर्टनुसार विराटची ब्रँड व्हॅल्यू 237.5 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजे 1 हजार 691 कोटी रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे भारताच्या वनडे संघाचा उपकर्णधार रोहित शर्माची ब्रँड व्हॅल्यू 23 मिलियन डॉलर इतकी आहे. विराटची ब्रँड व्हॅल्यू रोहितपेक्षा तब्बल 10 पट अधिक आहे.
ब्रँड व्हॅल्यूच्या बाबत विराटने बॉलिवूडचे स्टार अक्षय कुमार, दीपिका पादुकोण, रणबीर सिंह, सलमान खान, शाहरुख खान यासारख्या आघाडीच्या कलाकारांना देखील मागे टाकले आहे. क्रिकेटपटूंचा विचार केल्यास माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी, हिटमॅन रोहित शर्मा हे पहिल्या वीसमध्ये आहेत.
अशी आहे यादी
1) विराट कोहली- 1 हजार 691 कोटी
2) अक्षय कुमार- 745 कोटी
3) दीपिका पादुकोण- 666 कोटी
3) रणबीर सिंग- 666 कोटी
5) शाहरुख खान- 471 कोटी
6) सलमान खान- 397 कोटी
9) महेंद्र सिंह धोनी- 294 कोटी
15) सचिन तेंडुलकर- 179 कोटी
20) रोहित शर्मा- 164 कोटी