मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला हिंगणघाट पिडितेच्या कुटुंबियांना आर्थिक मदत सुपूर्द


मुंबई 


हिंगणघाट येथे घडलेल्या जळीतकांड प्रकरणात दुर्देवी मृत्यू झालेल्या पीडित तरुणीच्या कुटुंबाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला आहे. हिंगणघाटच्या श्रीमती कुणावार महिला महाविद्यालयात वनस्पतिशास्त्र विषयाची अर्धवेळ प्राध्यापक असलेल्या तरुणीवर एका माथेफिरूने एकतर्फी प्रेमातून पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला. 3 फेब्रुवारी रोजी हा धक्कादाय प्रकार घडल्यानंतर संपूर्ण राज्यातून संताप व्यक्त केला जात होता. या तरुणीची मृत्यूशी सुरु असणारी झुंज 10 फेब्रुवारी रोजी संपली आणि तिचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यानच्या काळात या मुलीच्या उपचारावरील सर्व खर्च राज्य सरकार करेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. हाच शब्द त्यांनी पूर्ण केला आहे.
हिंगणघाट पीडितेच्या उपचासाठी झालेला 5 लाख 43 हजार 441 रुपये खर्च आला. ही सर्व रक्कम राज्य सरकारने रुग्णालयाकडे सुपूर्द केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून रुग्णालयाला हा निधी देण्यात आला आहे. राज्य सरकारने मदत जाहीर करण्याआधी पीडितेच्या कुटुंबाने उपचारासाठी 60 हजार रुपये खर्च केले होते. ही रक्कमही पीडितेच्या कुटुंबाला राज्य सरकारने परत केली आहे. राज्य सरकारने 60 हजारांचा धनादेश पीडितेच्या वडिलांकडे सुपूर्द केला आहे. सोमवारी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी विभागाचे प्रमुख सदस्य सचिव डॉ. कमलेश सोणपूरे यांनी हिंगणघाट उपविभागीय महसूल अधिकार्‍यांकडे पीडितेच्या कुटुंबाला देण्यासाठीचा धनादेश दिला. त्यानंतर लगेचच उपविभागीय महसूल कार्यालयाने हा धनादेश पीडितेच्या कुटुंबाच्या ताब्यात दिला.
मुख्यमंत्र्यांनी हिंगणघाट पीडितेच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची घोषणा केल्यानंतर रुग्णालयाकडून अपेक्षित खर्चाची आकडेवारी मागवण्यात आली होती. त्यावेळी रुग्णालयाने एकूण 11 लाख 90 हजार रुपये खर्च येईल असा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून दोन टप्प्यांमध्ये निधी दिला. पहिल्या टप्प्यात चार लाख रुपये रुग्णालयाला देण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या तरुणीचा मृत्यू झाला. त्यानंतर झालेल्या एकूण खर्चाची उर्वरित रक्कम म्हणजेच एक लाख 43 हजार 441 रुपये रुग्णालयाला दिले. पीडितेच्या उपचारासाठी राज्य शासनाने एकूण पाच लाख 43 हजार 441 रुपये खर्च केला.