नागपूर : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेच्या उपचाराचा पाचवा दिवस आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे नागपूरमध्ये तिच्यावर उपचार करणार्या डॉक्टरांनी सांगितले. तिचं बर्न ड्रेसिंग करण्यात आल्याची माहिती डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनमध्ये दिली. तिच्या नाकातून पोटात ट्यूब टाकण्यात डॉक्टरांना यश आले. त्यामुळे शनिवारपासून तिला या ट्यूबद्वारे जेवण दिले जाणार आहे.
तिचे हार्टरेट वाढले होते. मात्र औषधांनंतर त्यात थोडी सुधारणा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितलं. तिचं ब्लडप्रेशर कमी जास्त होत असून, बर्न केसेसमध्ये ही बाब चिंताजनक असल्याचं डॉक्टर म्हणाले. मात्र तिच्यातले ऑक्सिजनचे प्रमाण चांगलं असल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केले.
हिंगणघाट जळीत कांडप्रकरणातील पीडितेच्या तब्येतीचा अहवाल समोर आला आहे. प्रकृती स्थिर असली तरी नाजूक आहे. एकतर्फी प्रेमातून पीडित तरुणीला जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडितेची प्रकृती स्थिर पण चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
पीडितेचे हृदयाचे ठोके वाढल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच तिचा ब्लड प्रेशर कमी जास्त होत असून हे तिच्या तब्येतीसाठी चांगले नसल्याचेही डॉक्टर म्हणाले. डाव्या हाताच्या बोटांमध्ये सुधारणा पण उजव्या हाताच्या बोटांमध्ये सुधारणा नसल्याचे डॉक्टरांना सांगितले.
पीडितेच्या श्वसन नलिकेत धूर गेला असून तिचे दात काळे झाले आहेत. तोंड आतून जळले असून चेहरा गंभीर भाजला आहे. कृत्रिमरित्या तिचा श्वास सुरू असून डेड स्किन काढली आहे. ती सध्या अतिदक्षता विभागात असून एक दीड महिना मेहनत घ्यावी लागेल, असे डॉक्टरांनी सांगितले.
उज्ज्वल निकम मांडणार पीडितेची बाजू
वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीत प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवला जाणार असून ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. उज्ज्वल निकम हे सरकारच्या वतीनं पीडितेची बाजू मांडणार आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ही माहिती दिली. ‘हिंगणघाटमधील जळीत प्रकरणाचा खटला लवकरात लवकर निकाली काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टाकडे दिला जाईल. या खटल्यात पीडितेची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याशिवाय, पीडित तरुणीचा खटल्याचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करेल,’ असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.
हिंगणघाट जळीत प्रकरण : आजपासून ट्यूबद्वारे देणार जेवण