पिकअप वाहन चोरी करणारी सराईत टोळी गजाआड
प प्रतिनिधी
पालघर
पालघर जिल्ह्यात पिकअप वाहनांची चोरी करणार्‍या सराईत टोळीच्या बोईसरच्या स्थानिक गुन्हे विभागाच्या पथकाने मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 64 गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून 27 पिकअप वाहने, चार वाहनांचे स्पेअर पार्ट जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक गौरव सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसांपासून या टोळीने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता.
मुकेश एकनाथ हांडवा(वय 25, रा. वसुरी, ता. वाडा), अविनाश सदु भोईर(वय 20, रा. वसूरी, ता. वाडा), सलमान इक्बाल शेख(वय 25, रा. तेलीवाडा, तारापूर), अमिरहुसेन गुलामहुसेन शेख(वय 26, रा. शेलारागाव, भिवंडी), शहीद हैदरअली शेख(वय 42, वसई, नरेश जयराम भोईर(वय 27, वसुरी, ता. वाडा)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पालघर जिल्ह्यात चार चाकी वाहनांच्या चोरीस आळा घालण्यासाठी तसेच चोरीस गेलेल्या चार चाकी वाहनांची माहिती काढून वाहन चोरी करणार्‍या टोळीचा शोध घेण्याबाबत गौरव सिंग यांनी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्ह्यातून चोरीस गेलेल्या महिंद्रा पिकअप व महिंद्रा मॅक्स या गाड्यांची माहिती संकलित करून त्यांचे इंजिन नंबर, चासी नंबर, रजिस्ट्रेशन नंबर तसेच स्पेअर पार्ट बदली करून विक्री करणारे 7 आरोपी निष्पन्न करून त्यांचा शोध घेवून त्यांना अटक केली आहे.