मुंबई
राज्यातून थंडी माघार घेणार असल्याचे सूतोवाच भारतीय प्रादेशिक विभागाने केल्याच्या दुसर्याच दिवशी मुंबईमध्ये जणू उन्हाळा सुरू असल्याचे जाणवले. सोमवारी मुंबईत सांताक्रूझ येथे 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर कुलाबा येथे हे तापमान 33 अंश सेल्सिअस होते. राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सांताक्रूझ येथे नोंदवले गेले. कुलाबा येथे आर्द्रताही वाढल्याने वाढलेल्या तापमानाचा अधिक त्रास मुंबईकरांना झाला.
सोमवारी सांताक्रूझ येथील कमाल तापमानात रविवारपेक्षा 2.1 अंशांनी, तर कुलाबा येथील तापमानात 1 अंशांनी वाढ झाली होती. हे तापमान सरासरीपेक्षा अनुक्रमे 3.9 अंश आणि 3.1 अंशांनी अधिक आहे. येत्या आठवडाभर तापमानातील ही वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. 13 फेब्रुवारीला तापमान एका अंशाने वर चढू शकते. वार्यांची दिशा बदलून आता पूर्व ते आग्नेय पट्ट्यातून वारे वाहत असल्याने तापमानामध्ये एकाएकी वाढ झाली आहे. कोकण विभागात किमान तापमानातही वाढ झाल्याचे समोर आले आहे. कुलाबा येथे किमान तापमान 21.5, तर सांताक्रूझ येथे किमान तापमान 21.2 अंश सेल्सिअस होते. हे तापमान कुलाबा येथे सरासरीपेक्षा 2 अंशांनी तर सांताक्रूझ येथे 3.7 अंशांनी अधिक होते. मोसमात थंडीने मध्येच विश्रांती घेत उकाड्याची जाणीव करून दिली होती. मात्र यंदा थंडी कमी काळ होती अशी प्रतिक्रिया मुंबईकरांमध्ये उमटली.
लांबलेल्या पावसाळ्यानंतर थंडीही लांबेल अशी अपेक्षा मुंबईकरांना होती. मात्र ही अपेक्षा खोटी ठरलेली दिसून येते. गेल्या वर्षी 13 फेब्रुवारीला मुंबईत फेब्रुवारीतील सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले गेले. हे तापमान 36.3 अंश होते. सन 2013 मध्ये 14 फेब्रुवारीला फेब्रुवारीतील सर्वाधिक कमाल तापमान नोंदवले गेले होते. मात्र इतर वर्षी तापमानाचा हा पारा 19 किंवा 20 तारखेनंतर फेब्रुवारीतील सर्वाधिक कमाल तापमानाच्या दिशेने प्रवास करताना आढळला होता. सन 2012 मध्ये 39.1 तर सन 2015मध्ये 38.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले होते.
मुंबईच्या बंदरात धडकणार आज पहिलं रो-रो जहाज