साखरा बलात्कार प्रकरणातील आरोपी गजाआड
प प्रतिनिधी
हिंगोली- सेनगाव
तालुक्यातील साखरा येथील बलात्कार आणि आत्महत्या प्रकरणातील फरार असलेल्या तिन्ही आरोपींच्या काल पोलिसांनी मुसक्या आवळल्या. आरोपीला ताब्यात घेतले खरे. मात्र, त्यांच्या कृत्यामुळे माझी पत्नी आपल्या चिमुकल्यांना सोडून गेली. त्यामुळे, या पाखरांचे मी संगोपन कसे करू, अशी खंत व्यक्त करत आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची विनंती पतीने केली आहे.
चंद्रभान गणपत कायंदे, परमेश्‍वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे, अशी बलात्कार करणार्‍या आरोपींची नावे आहेत. साखर्‍यातील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण जिल्हाच हादरून गेला आहे. पीडितेने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत आरोपींनी आपल्याला सतत 5 वर्षे कसा त्रास दिला याबाबत माहिती दिली असून झालेली वेदना भावनिक शब्दातून मांडली होती. एवढेच नव्हे तर, मृत्यूच्या जबड्यात उभे असलेले आणि शेवटच्याक्षणी माणूस अजिबात खोटे बोलत नसल्याची देखील पीडितेने आठवण करून दिली होती. तसेच महिलांवरील अत्याचार हा अजिबात कमी झालेला नसल्याचा दाखला देखील आपल्या पत्रात पीडितेने दिला होता. या प्रकरणात सर्वप्रथम आकस्मिक मृत्यूची नोंद करून सेनगाव पोलीस मोकळे झाले होते. मात्र, जेव्हा मृत्यूपूर्वी चिठ्ठी हाती लागली तेव्हा सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का बसला. हतबल झालेल्या नातेवाईकांना पुन्हा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घ्यावी लागली. गुन्हा दाखल झाला आणि 48 तासानंतर सेनगाव पोलिसांनी आरोपींच्या मूसक्या आवळल्या. उद्या न्यायालयात आरोपींना हजर केले जाणार आहे.