कोरेगाव-भीमाः नवलखा, तेलतुंबडेंना धक्का

अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला


- प्रतिनिधी मुंबई - कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा आणि प्रा. आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून चार आठवड्यांचं संरक्षण देण्यात आले आहे. न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. जानेवारी २०१८ मध्ये पुणे जिल्ह्यातील कोरेगावभीमा येथे उसळलेल्या हिंसाचाराप्रकरणी पुणे पोलिसांनी नवलखा, तेलतुंबडे व अन्य काही कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या सर्व आरोपींचे नक्षवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे. डिसेंबर २०१७मध्ये पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत चिथावणीखोर भाषणे देण्यात आली होती. या भाषणांनंतर दुसऱ्याच दिवशी कोरेगाव-भीमामध्येहिंसाचार उसळला होता. या परिषदेला नक्षलवाद्यांचा पाठिंबा होता, असा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. पुणे सत्र न्यायालयाने मागील वर्षीच्या नोव्हेंबर तेलतुंबडे व नवलखांचा अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. डिसेंबरमध्ये उच्च न्यायालयाने त्यांना अटकेपासून संरक्षण देताना जामिनावरील निर्णय पुढे ढकलला होता... एल्गार परिषद प्रकरण एनआयए कोर्टात एल्गार परिषद प्रकरण आता मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात वर्ग करण्यास पुणे कोर्टाने मंजुरी दिली आहे. एनआयने या संदर्भातला अर्ज केला होता. त्यानुसार हा खटला मुंबईतील विशेष एनआयए कोर्टात वर्ग करण्यात आला आहे. याआधी कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला.