शेतकर्‍यांची कर्जमाफी फसवी ः फडणवीस


मुंबई
शेतकर्‍यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार आहोत. म्हणूनच विधान सभेचे कामकाज ठप्प केले आहे. सभागृह चालवून फायदा काय ? असा सवाल विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या भेटी दरम्यान सोलापूरच्या 50 हजार शेतकर्‍यांनी दिलेले पत्र हे राज्यपालांना देणार आहोत असे फडणवीस यांनी सांगितले. सभागृहाच्या दुसर्‍या दिवसाचे कामकाज ठप्प झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपने घेतलेल्या आक्रमक पवित्र्याबाबत माहिती दिली.
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीच्या ज्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत, त्यानुसार प्रत्येक गावातील 25 टक्के शेतकर्‍यांनाही कर्जमाफी मिळाली नाही असा दावा फडणवीस यांनी केला. ही शेतकर्‍यांची चक्क फसवणूक असून सांगूनही मदत दिली गेली नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले. सरकार ठोस कारवाई करत नाही तर अशा कर्जमाफीचा काय फायदा असेही ते म्हणाले. भारतीय जनता पक्षामार्फत राज्यातील प्रत्येक तहसील कार्याबाहेर शेतकर्‍यांचे विषय घेऊन आंदोलन करण्यात येत आहे. शेतकर्‍यांना जोवर न्याय मिळत नाही तोवर संघर्ष सुरू राहील असेही ते यावेळी म्हणाले. आमच्या माता भगिनींवर होणारे अत्याचार वाढले आहेत त्याबाबतही सभागृहात मुद्दा मांडल्याचे त्यांनी सांगितले.