प प्रतिनिधी
मुंबई
धुलीवंदन सणानिमित्त रंगांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. मात्र, मुंबईत धुलिवंदनादरम्यान वापरण्यात येणार्या रंगामुळे बाधा झाल्याने 38 जणांना पालिकेच्या केईएम, नायर आणि सायन या तीन रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या या पैकी केईएम रुग्णालयात एकावर उपचार सुरू असून इतर 37 जणांना घरी सोडून देण्यात आले आहे. मुंबईत धुलीवंदन हा सण मोठा उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त रंगाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यावर्षी कोरोना विषाणूची भीती असली तरी अनेक ठिकाणी हा सण साजरा करण्यात आला. हा सण साजरा करताना वापरण्यात येणार्या रंगांमुळे 38 जणांना बाधा झाल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये रंग डोळ्यात जाऊन जळजळ होणे, डोळ्यांना त्रास होणे, त्वचेला खाज येणे, त्वचेला इन्फेक्शन होणे, धुलीवंदनादरम्यान मार लागल्याने जखमी होणे आदी प्रकारांचा समावेश आहे. रंगामुळे बाधा झाल्याने नायर रुग्णालयात 6 जण उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सायन रुग्णालयात 23 जणांना दाखल करण्यात आले होते. या सर्वांवर उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर केईएम रुग्णलयात 9 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी 8 जणांना घरी सोडण्यात आले असून एकावर अद्यापही उपचार सुरू आहेत. पालिकेच्या इतर व राज्य सरकारच्या रुग्णालयात रंगाची बाधा झालेले किती रुग्ण दाखल झाले याची माहिती रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झालेली नाही.
मुंबईत धुलिवंदनादरम्यान 38 जणांना रंगाची बाधा