मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर टेम्पोचा भीषण अपघात;5 मित्रांचा जागीच मृत्यू


प्रतिनिधी
पुणे
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. जुन्या महामार्गाकडे जाणार्‍या अंडा पॉईंट खंडाळा इथल्या तीव्र धोकादायक वळणावर हा अपघात घडला आहे. भरधाव वेगात असणारा टेम्पो पलटी झाल्याने 5 दुचाकीस्वारांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे तर एक जण सुखरुप बचावला आहे. चालकाचं नियंत्रण सुटल्याने टेम्पो पलटी झाला आणि त्याचवेळी तो लघुशंकेसाठी थांबलेल्या दुचाकीस्वारांच्या अंगावर पडला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
पुण्याहून मुंबईकडे पिठाच्या पोत्याची वाहतूक करणारा भरधाव आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटला. या अपघातात मुंबईहून पुण्याकडे येणारे तीन दुचाकीवरील 6 दुचाकीस्वार लघुशंकेसाठी रस्त्याच्या कडेला थांबले असता भरधाव टेम्पो त्यांच्या अंगावर पलटला. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान खोपोली नगरपरिषदेच्या रुग्णालयात मृत्यू झाला आहे. यामध्ये एक तरुण बचावला असल्याचं सांगण्यात येत आहे.
सर्व दुचाकीस्वार पर्यटनासाठी अलिबाग इथे गेले होते. तेथून पुन्हा (तळेगाव) पुण्याकडे परतत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून खंडाळा महामार्ग पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघाती टेम्पो रस्त्यातून बाजूला केला.
प्रदीप चोळे (38), अमोल चिलमे (30), नारायण गुंडाळे (28), निवृत्ती गुंडाळे (30), गोविंद नलवाड  (30) अशी मृतांची नावे आहेत. बालाजी भंडारी (वय 35) असं या अपघातामध्ये बचावलेल्या तरुणाचं नाव आहे. हे सगळेजण तळेगाव मावळ इथे राहणारे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बालाजी भंडारी हा थोडा लांब उभा राहिला असल्यामुळे तो थोडक्यात बचावल्याचं सांगण्यात येत आहे. तर आपल्या मित्रांना डोळ्यांदेखत जीव सोडताना पाहिल्याने बालाजी यांना मोठा धक्का बसला आहे.