प्रतिनिधी
मिरा-भाईंदर
मिरा-भाईंदरच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत चक्क नवनिर्वाचित उपमहापौरांसह भाजपाच्या सहा नेत्यांची पाकिटे चोरट्याने चोरली आहेत. कार्यकर्त्यांच्या घोळक्यात राहून चोरट्याने ही चोरी केली आहे. चोरट्याने दोघांकडील एकूण 65 हजार रुपये चोरले आहेत. ही घटना 26 फेब्रुवारीला घडली.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेत महापौर आणि उपमहापौरांची 26 फेब्रुवारीला निवडणूक होती. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पालिकेतील तापलेलं वातावरण पाहता तेथे मोठा पोलीस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता. मात्र या बंदोबस्तातही चोरटयाने भाजपचे नगरसेवक सचिन म्हात्रे यांचे 37 हजार तर नगरसेविका दिपिका अरोरा यांचे पती पंकज अरोरा यांचे 28 हजार चोराने पाकिट मारुन लंपास केले. या घटनेनंतर दोघांनी भाईंदर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तर याशिवाय नवनिर्वाचित उपमहापौर हसमुख गहलोत यांनाही या चोरटयाने सोडलं नाही. त्याचबरोबर भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे, भाजपाचे माजी नगरसेवक अनिल भोसले, अनुसुचित सेलचे अध्यक्ष तुषार अरोरा यांचीही पाकिटे मारली गेली. मात्र त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली नाही.
दरम्यान, पालिकेच्या परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे यात पांढ-या रंगाचे कपडे घातलेली एक संशयास्पद व्यक्ती आढळल्याचे पोलिसांनी सांगितले असून, त्यादृष्टिने तपास सुरू केला आहे.
उपमहापौरासह भाजपच्या सहा नेत्यांची पाकिटं मारली तब्बल 65 हजार चोरीला