मुंबई
जगभरात करोना व्हायरसमुळे खळबळ उडाली असताना महाराष्ट्रात या व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून सरकारी पातळीवर अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. बुधवारी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोना व्हायरसची कारणं, परिणाम, उपाय, राज्य सरकारची भूमिका आणि उपलब्ध आरोग्य सुविधा या सगळ्याबद्दल विधानपरिषदेमध्ये सविस्तर भूमिका मांडली. मात्र, या महत्त्वाच्या विषयावर गुरुवारी विधानसभेमध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी करोना व्हायरस आणि सरकारी उपाययोजना यावर विधानसभेला संबोधून निवेदन सादर केले. यावेळी, ‘आगामी होळीच्या उत्सवामध्ये राज्यातल्या नागरिकांनी थोडक्यात आनंद साजरा करून आवश्यकता नसेल, तर एकत्र जमणे टाळावं’, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या जनतेला केलं आहे.
करोना व्हायरसचे देशात आत्तापर्यंत 29 रुग्ण आढळले असून त्यामध्ये महाराष्ट्रात अजूनपर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, त्याआधीच महाराष्ट्रात करोना व्हायरस येऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासंदर्भात विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान विरोधकांनी मांडलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. ‘गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याला जे करायला हवं होतं, ते आपण केलं नाही. ते कळण्यासाठी अशा एखाद्या आपत्तीची आपल्याला आवश्यकता वाटते, हे दुर्दैव आहे. सध्या पुणे, मुंबई आणि नागपूरमध्ये करोनाच्या चाचणीची सुविधा उपलब्ध केली आहे. पूर्वी सार्स, स्वाईन फ्लू आला, तेव्हा आपण भयभीत झालो. पण तुम्ही भयभीत होऊ नका. भयभीत न होता आपल्याला या संकटाचा मुकाबला करायचा आहे. मास्कचा पुरेसा साठा आपल्याकडे आहे’, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
विमानतळांवर सूचना
‘स्वाईन फ्लूवेळी सर्व हॉस्पिटल्सना स्वतंत्र वॉर्डची सूचना केली होती. सर्व खासगी रुग्णालयांना आपण स्वतंत्र वॉर्डची विनंती केली आहे. करोनाचा व्हायरस थंड वातावरणात जास्त काळ जिवंत राहू शकतो. राज्यात ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमानं येतात, तिथे काळजीच्या सूचना दिल्या आहेत. विमानातल्या सफाई कर्मचार्यांना देखील सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जाहिरात विभागाला सांगितलं आहे की शक्य त्या मार्गाने करोनाबाबत योग्य त्या सूचना लोकांपर्यंत पोहोचवा’, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
पाणबुडीत बसवून पर्यटकांना कोकणचा समुद्र दाखवणार
‘कोकणचे निसर्गसौंदर्य हे आपलं वैभव आहे. ते जगापुढे आले पाहिजे. त्यासाठी आवश्यक त्या सर्व योजना सरकार आखत असून पाणबुडी प्रकल्प हा त्यातील सर्वात महत्त्वाचा आहे. पाणबुडीत बसून समुद्री जीवन दाखवण्याची ही योजना आहे आणि ती कोकणातूनच सुरू होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी विधानसभेत केली. कोकणच्या प्रश्नांसंदर्भातील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. ‘कोकण हा नेहमीच आमच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. कोकणचा समुद्र किनारा, तेथील वनराई व अन्य निसर्गसंपदा हे वैभव आहे. ते जगापुढं यावं यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू आहे. पर्यटकांना तिथं येण्यासाठी ज्या काही सुविधा हव्यात त्या देण्याचा प्रयत्न आहे. रस्त्यांची कामे सुरू आहेत. काही ठिकाणी काँक्रिटचे तर, काही ठिकाणी इतर प्रकारचे पक्के व टिकाऊ रस्ते बांधण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. चिपी विमानतळाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या 1 मे रोजी, महाराष्ट्र दिनी हे विमानतळ सुरू व्हायलाच पाहिजे, अशा सूचना संबंधितांना देण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ‘कोकणात येणार्या पर्यटकांना पाण्याखालचे जग दाखवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीच पाणबुडी योजना आणत आहोत. त्याचा अभ्यास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ठाकरे यांनी सांगितले.
कोरोनाचा एकत्रित लढा देऊ या होळी थोडक्यात साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन