शिवनेरीवरून शिवज्योत घेऊन परतताना मृत्यू

प वृत्तसंस्था
जुन्नर
 शिवज्योत घेऊन परतत असताना टेम्पोतून पडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. प्रतीक उमेश शिंगोटे (12, रा. खामुंडी, ता. जुन्नर) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली, अशी माहिती ओतूर पोलिस ठाण्याचे ठाणे अंमलदार पी. डी. दाते यांनी दिली. प्रतीक येडगाव येथील कुकडी व्हॅली पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सहावीत शिकत होता. खामुंडी भागातील काही तरुण शिवजयंतीच्या शिवज्योत आणण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावर गेले होते. तेथून परतत असताना जुन्नर-बनकरफाटा रस्त्यावर कुमशेत फाटा येथे पिकअप टेम्पोतून प्रतीक खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला ओतूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, असे डॉक्टरांनी सांगितले. या अपघाताबाबत ओतूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, नंतर गुन्हा जुन्नर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.