अखेर कृषी पदव्युत्तर अभ्यासक्रमांना व्यावसायिक दर्जा; विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे

प प्रतिनिधी
पुणे
कृषी पदव्युत्तर पदवीला व्यावसायिक दर्जा देण्याच्या विद्यार्थ्यांच्या मागणीवर गेल्या 10 दिवसांच्या आंदोलनाची दखल घेत शासनाने मागणी मान्य केली आहे आणि तसा आदेशही जारी केला आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी विद्यार्थ्यांनी शासनाचे आभार मानत आंदोलन मागे घेतले.
शासन आदेश प्राप्त होताच राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या कार्यालयाबाहेर राज्यातील चारही कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी साखर व पेढे वाटून आनंद व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष करीत परिसर दणाणून सोडला.
याबाबत शासन आदेशात नमूद केले आहे की, कृषी विद्यापीठांतर्गत व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्यपदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पुढील प्रमाणे : बीएससी (एमबीएम), बीबीएम (कृषी), बीबीए (कृषी), बीएससी (ओनर्स) (कृषी व्यवसाय व्यवस्थापन, एमएससी (कृषी), एमएससी (उद्यानविद्या), एमएफसी (मत्स्य विज्ञान),  एमटेक (अन्न तंत्रज्ञान), एमएससी (कृषी जैव तंत्रज्ञान), एमटेक (कृषी अभियांत्रिकी), एमएससी (गृह विज्ञान), एमएससी (काढणी पश्‍चात व्यवस्थापन), एमबीए (कृषी) व एमबीएम (कृषी) (व्यवसाय व्यवस्थापन), एमएससी (कृषी),  कृषी व्यवसाय व्यवस्थापन, एमएससी (एबीएम).
या कृषी विद्यापीठा अंतर्गत शिकवण्यात येणार्‍या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांना व्यावसायिक अभ्यासक्रम म्हणून घोषित करण्याचे आदेश कृषी विभागाचे कार्यासन अधिकारी प्रताप गीते यांनी जारी केलेले आहेत.


दरम्यान, शासनाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी कृषी परिषदेचे महासंचालक विश्‍वजित माने यांची भेट घेत शासनाचे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना पुढील सत्रांच्या प्रवेशासाठी 2 मार्चपर्यंत असलेली मुदत  वाढवून देण्याची मागणी केली. यावेळी  कृषी परिषदेचे विस्तार संचालक डॉ. विठ्ठल शिर्के आणि शिक्षण संचालक हरिहर कौसडीकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.