प प्रतिनिधी
मुंबई
मेट्रो 3 च्या आरे कॉलनीतील कारशेडसाठी झालेल्या वृक्षतोडीला मोठा विरोध झाला होता. त्यामुळे कारशेडला महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिली होती. हे कारशेड कुठे तयार करायचं याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला रोज अडीच कोटी रुपयांचा तोटा होत आहे. कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-3 साठी आरे कॉलनीतील मोठ्या प्रमाणावर झाडं तोडावी लागणार होती.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 29 नोव्हेंबर 2019 रोजी आरेतील कारशेडला स्थगिती दिली होती. ही स्थगिती देऊन आता 100 दिवस उलटून गेले आहेत. कारशेड कोठे करायचे याचाही निर्णय अद्याप झालेला नाही. त्यामुळे कारशेडशिवाय मेट्रो-3 च्या कामाला विलंब होणार आहे. ज्या वेळी या प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात आला त्या वेळी त्याचा खर्च 23 हजार कोटी रुपये इतका होता. आता तो वाढून 32 हजार कोटी रुपयांवर गेला आहे. मेट्रो-3 साठी आरेमध्ये 33 हेक्टर जागेवर कारशेड उभारले जाणार होते. यासाठी हजारो झाडांचा बळी जाणार होता. त्यामुळ पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या कारशेडला विरोध दर्शवला होता. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना आरेमध्ये कारशेडविरोधात आंदोलनही करण्यात आले होते. त्यानंतर वित्त विभागाने अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चार जणांची समितीही नेमली होती. ही समिती कारशेडसाठी पर्यायी जागेचा शोध घेणार होती. या समितीने कारशेड आरे कॉलनीच्या बाहेर हलविणं अवघड असल्याचं नमूद केलं आहे.
मेट्रो कारशेड स्थगितीमुळे एमएमआरसीला रोज अडीच कोटींचा तोटा