प्रतिनिधी
मुंबई :दिल्लीतील दंगलीची १०० टक्के जबाबदारी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारचीच असून ही दंगल रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अपयशी ठरल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वक्तव्येही या दंगलीला कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला. चुनाभट्टीच्या सोमय्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसने कार्यकर्ता शिबिराचं आयोजन केलं होतं. त्याला संबोधित करताना शरद पवार यांनी दिल्लीतील हिंसाचारावरून केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. दिल्ली शहर अनेक भाषिकांचे आहे. राजधानीचे शहर आहे. दिल्लीच्या निर्मितीपासूनच भाजपाला जनतेचा पाठिंबा मिळण्याची चिन्हे नव्हती. सत्ता मिळण्याची चिन्हंही दिसत नाही. त्यामुळे यावेळी सांप्रदायिकतेचा आधार घेऊन जातीय सलोखा बिघडवण्याचे काम झाले आहे, असा थेट आरोप शरद पवार यांनी केला. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा प्रचाराचा रोख पाहिला तर धार्मिक तेढ निर्माण करणारा होता. पंतप्रधान यांचे भाषण ऐकले तर लक्षात येते. देशाचं नेतृत्व करणारी व्यक्तीच धार्मिक वितंडवाद वाढवण्याचे वक्तव्य करते हे शक्तता चिंताजनक आहे, असंही ते म्हणाले. मिळालेली सत्ता जनतेसाठी वापरण्याऐवजी भाजपचे नेते मगोली मारोपची भाषा करताना दिसले. दिल्लीच्या शाळेवरही हल्ला केला गेला. शैक्षणिक वस्तू नष्ट केल्या गेल्या. शैक्षणिक संस्थेतसुद्धा हल्ला करण्यासाठी भक्तांच्या मदतीने पावले टाकली जात आहेत, अशी चिंता व्यक्त करतानाच जी शक्ती देशाच्या ऐक्याला धक्का देण्यासाठी सरसावत आहे, तिला दूर करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष दिल्लीत येतात आणि त्याच राज्यात दंगली होतात. तरीही जाहीरपणे देशाच्या भल्याची वक्तव्य केली जातात, हा अजबच प्रकार आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला. सांस्कृतिक राजधानी उद्धवस्त करण्याचे काम करणाऱ्या शक्तीला या निवडणुकीत बाजूला सारण्याचे काम झाले आहे. त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आले पाहिजे. ऐक्याचे चित्र त्यांना बघवत नाही. समाजासमाजात आग लावण्याचे काम होत आहे, असा आरोप त्यांनी केला. आजचे राज्यकर्ते धर्म, जातीचा आधार घेऊन फूट पाडण्याचे काम करत असतील तर दुहेरी शक्ती पुढे सरसावत असतात. त्यामुळे ही जातीय शक्ती घालवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अग्रभागी असेल. अन्याय-अत्याचाराच्या भीती निर्माण करून जातीयवाद निर्माण करून दंगली घडवून आणणाऱ्या शक्तीला खड्यासारखे बाजूला करायचे आहे.