आज मुख्यमंत्री अयोध्येत
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज शनिवारी अयोध्येला जाणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौर्‍यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. उद्धव ठाकरे शनिवारी सहकुटुंब अयोध्येला जाणार आहेत. मात्र त्यांच्या दौर्‍यावर कोरोनाचं सावट आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौर्‍यात बरेच बदल करण्यात आले आहेत.
सकाळी 9 वाजता मुख्यमंत्री मुंबई विमानतळावरुन अयोध्येसाठी निघतील. सकाळी 11 वाजता ते लखनऊमध्ये पोहोचतील. अयोध्येतल्या पंचशील हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम असेल. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेतील. दुपारी 4 वाजता ते रामजन्मभूमीकडे निघतील. त्यानंतर 4.30च्या सुमारास ते रामजन्मभूमी आणि रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर, साडे पाचच्या सुमाराला मुख्यमंत्र्यांचा परतीचा प्रवास सुरू होईल. महत्त्वाचं म्हणजे कोरोनाचं सावट असल्याने यावेळी शरयू आरती होणार नाही. शरयू तिरावर आरतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा झाली. करोनाचा जसा प्रादुर्भाव पसरतोय त्यामुळे जास्त गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शरयूची आरती करणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरती करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.
याआधी नोव्हेंबर 2018 मध्ये राममंदिराचा निकाल येण्याआधी उद्धव ठाकरेंनी अयोध्येचा दौरा केला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून पहिल्यांदाच अयोध्येला जाणार आहेत. महाविकासआघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्याचं औचित्य साधत उद्धव ठाकरेंचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलेलं नाही, हा संदेश अयोध्या दौर्‍यानिमित्त मुख्यमंत्री पुन्हा एकदा देणार आहेत.
दरम्यान, रामलल्ला यांच्या आर्शिवादाने राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला. महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष तर पूर्ण करेलच तसेच शिवाय पुढील पंधरा वर्षे सत्ता कायम राखण्यातही यशस्वी ठरेल, असा विश्‍वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्या अयोध्या दौर्‍यावर आहेत. या पार्श्‍वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.

शिवसैनिकालाही राम मंदिर ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळात घ्या
शिवसेनेच्या किमान एका सदस्याला राम मंदिर ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळात घ्या, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. यासाठी त्यांनी मोदींना एक पत्र लिहिले असून त्याद्वारे राम मंदिराच्या चळवळीत शिवसेनेचेही योगदान असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात सरनाईक म्हणतात, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिराच्या उभारणीसाठीच्या चळवळीत बहुमुल्य योगदान दिले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन किमान एका शिवसैनिकाला तरी राम मंदिर ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळात घ्यावे.