नवी मुंबई मनपा कर्मचार्‍यांना एप्रिलपासून लागू सातवा वेतन

प प्रतिनिधी
नवी मुंबई
सरकारने सातव्या वेतन आयोगाची घोषणा केली. सातव्या वेतनाचा लाभ इतर आस्थापनांना मिळाला, मात्र नवी मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी त्यापासून वंचित होते. मनपा प्रशासन त्यासाठी पाठपुरावा करतच होते. नुकतेच शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने नगरसेवक किशोर पाटकर यांनी राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मनपा कर्मचार्‍यांची कैफियत मांडली होती. कर्मचार्‍यांच्या भावना जाणून घेत एकनाथ शिंदे यांनी या महिन्यापासून मनपा कर्मचार्‍यांना सातवा वेतन सुरू करण्यास मनपा प्रशासनाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मनपा कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यातील इतर आस्थापनांनी त्यांच्या कर्मचार्‍यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या आहेत. मात्र नियमांच्या कात्रीत अडकलेल्या मनपा प्रशासनाने त्यावर मोहोर उमटवली नव्हती. मागील वर्षभरापासून शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे असे उत्तर कर्मचार्‍यांना मिळत होते.
 विद्यमान आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांचा देखील यासाठी पाठपुरावा सुरू होता. अखेर शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने नगरसेवक किशोर पाटकर यांनी मध्यस्थी करत राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रशासनाच्या वतीने कर्मचार्‍यांच्या व्यथा मांडल्या.
त्या जाणून घेतल्यानंतर त्यांनी तत्परतेने नवी मुंबई मनपाच्या कर्मचार्‍याना सातवा वेतन आयोग सुरू करण्यासाठी मनपाला मान्यता दिली आहे.  
पालकमंत्री या नात्याने त्यांनी येथील कर्मचार्‍यांना दिवाळी आधीच ही गोड भेट दिल्यामुळे अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.