प प्रतिनिधी
मुंबई
गांजाची पुडी दिली नाही म्हणून तीन जणांनी एका तरुणाला लाथाबुक्यांनी जोरदार मारहाण केली. त्यानंतर या तरुणाच्या डोक्यात लाकडी बांबूने जोरदार प्रहार करून त्याला जीवे ठार मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.
कॉटनग्रीन स्टेशनसमोरील स्काय वॉकवर मंगळवारी रात्री सव्वा अकरा वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे. नागपाड्याच्या सिद्धार्थ नगरमधील पालिका वसाहतीत राहणारा बंटी कुमारदास कांबळे हा त्याचा मित्र अमिन पटेल याच्यासोबत काल रात्री कॉटनग्रीन स्टेशनसमोरील स्काय वॉकवर गप्पा मारत बसले होते. यावेळी तीन जणांनी पटेल यांच्याकडे गांजाच्या पुडीची मागणी केली. तेव्हा मेरे पास नही है, असं पटेल यांनी या तिघांना सांगितले. त्यामुळे पटेल आणि या तिघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली आणि भांडणाचं पर्यावसान हाणामारीत झाले. या तिन्ही आरोपींनी पटेलला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. पटेलला जमिनीवर पाडून जोरजोरात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यामुळे तो मदतीसाठी जोरजोरात ओरडत होता. पण कुणीही त्याच्या मदतीला धावून आले नाही.
त्यानंतर या संतापलेल्या तिन्ही तरुणांनी पटेल याला लाकडी बांबूने बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात हा बांबू घातला. त्यामुळे पटेल क्षणात रक्तबंबाळ झाला आणि जागेवर निपचित पडला.
या प्रकारामुळे घाबरलेल्या या तिन्ही आरोपींनी घटनास्थळाहून पलायन केलं. कांबळे यांनी तात्काळ काळाचौकी पोलीस ठाण्यात धाव घेऊन सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करत पटेल याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच तिन्ही आरोपींविरोधात भादंवि 302,397, 324 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून तिघांच्याही मुसक्या आवळल्या आहेत.
गांजा दिला नाही म्हणून डोक्यात बांबू घालून ठार मारले